हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ!

3

Written on 8:40 AM by केदार जोशी

भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.

हिंदू सुरू होते तीच मुळी मोठ्या स्वगतांतूनच. त्यातून आम्हास कळले ही खंडेराव नावाच्या कुण्या व्यक्तीची ही कहाणी. तो जातीने (आता हिंदू म्हणले की जात आली हे ओघानेच, ती द्विरुक्ती टाळून आम्ही जातच म्हणणार) कुणबी. मोप शेती बिती असलेला पण शेती करायची इच्छा नसलेला. खंडेराव घरातून श्रीमंत! अठरा प्रहर त्याचा खरी माणसांची ये-जा. पण गड्याला शिक्षणाची आवड. तो मोरगाव नावाच्या गावी राहतो, शिकतो, पूढे औरंगाबादेस येतो अन तिथे उच्चविद्याविभूषित होतो पण तरीही मनाने स्थिर नसतो. जाती व्यवस्था, पॉलीटिक्स, शेती की शिक्षण, घरची नाती आणि भारताचा पुरातत्त्व इतिहास हा सर्व गोंधळ त्याचा मनात कायम धुडगूस घालत असतो. त्यातच तो अचानक हिंदू संयुक्त कुटूंबाचा कुटुंबप्रमुखच होतो. मी जरा पुढेच गेलो. अन चार ओळीत हिंदूची कथाच सांगीतली नाही का? पण मग पास्टचे काय? तर ही कादंबरी वर्तमानातून भूत व परत वर्तमान अशी फ्लॅशब्याक स्वरूपात येते.

खंडेराव हा पुरातत्त्व विषयात पि एच डी करत असतो. आता पुरातत्त्व आले की आपण हडप्पा, मोहंजो-दाडो बद्दल बोलणार ही तुम्ही ताडले असेलच. अगदी तेच. उत्खननासाठी तो मोहंजो-दाडोला गेलेला असतो, तिथे त्याला वडील मरायला टेकले असल्याची तार येते आणि त्याचा सिंधू संस्कृती पासून परत मोरगावाकडे प्रवास चालू होतो. पाकिस्तान ते भारतातील मोरगाव एवढा मोठा प्रवास, त्यातच वडील आजारी म्हणजे वेळ जाता जाणार नाही, त्या प्रवासात त्याला आपले लहाणपण, भावंड, घरची माणसं, नाती-गोती, आला-गेला, बाराबलूतेदार, चिमणी-पाखरं, मोत्या-मुत्या, झीबू-ढबू , महार-मांग, पेंढारी-लभाने, होळकर-पेशवे, वेशीमधले-वेशीबाहेरचे, मराठा-कुणबी, वैदू-ब्राम्हण, तिरोनी आत्या ते चिंधी आत्या, मोरगाव ते औरंगाबाद, शेती ते पुरातत्त्वखाते, सिंधूसंस्कृती ते आजचे हिंदू हे सर्व आलटून पालटून त्याचा मनात पिंगा घालत असतात. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा!! त्याचे मन हे असे धाव घेत असताना आम्ही त्यासोबत खंडेरावाचा प्रवास करत होतो. त्याच्या विचारातून मोरगाव सतत डोकावत राहते. त्याचे विचार केवळ शेती पुरते मर्यादित नसून ते विविध विषयांना स्पर्श करत असतात. उदाहरणार्थ तुलनेने अशिक्षित असलेल्या जातींमधील लैंगिक स्वातंत्र्य असो की भारतातील अनेक जमातींमधील स्त्रियांचे सामाजिक स्थिती, त्याची चिंधी आत्या नवर्‍याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे. चिंधी आत्याची घुसमट ही अनेक स्त्रियांच्या घुसमटीची प्रतिनिधित्व करते तर गावात असलेली लभानी वेश्या ही मुक्त असणार्‍या समाजाचे प्रतिनिधित्व करते. महार-मांग कुणब्याच्या शेतात काम करणारा भाग असो की विठ्ठलरावांनी गावाच्या उचापती सोडवण्याकरता केलेले लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे काम असो, प्रत्येकाशी वाचक (खेड्यात न राहताही) रिलेट होऊ शकतो. आणि त्यामुळेच कदाचित हिंदू ह्या शब्दाचे प्रयोजन! ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्‍यापैकी ताकदीने उभी करतात. बर्‍यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते.

नेमाडे आपल्या त्याच त्या शैलीतून बाहेर येत नाहीत हे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. उदाहरणार्थ
खंडेरावाचे व्यक्तीचे इंटर पर्सनल स्किल्स थेट आपल्या पांडुरंग सांगवीकरासारखे. आता हा पांडू कोण? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो पांडू म्हणजे आपला पिसपीओ. पांडूसारखेच खंडेरावास घरातल्या माणसाची घृणा (अपवाद त्याचा भाव भावडू) आई वडिलांबरोबर संबंध चांगले नाहीत, आई वडील पांडू सारखेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात पण बंड करून खंडेराव आपले इत्सिप्त साध्य करतो, त्या घडामोडी थेट कोसलाच्याच, ते कारेपण, मनाशीच चाललेली कुस्ती ह्याची तुलना वाचक नकळत कोसलाशी करतो. नेमाड्यांनी खंडेरावाचे कॅरेक्टर पांड्यावरून उचलले असल्याचे जाणवत राहते. पण थोडे वेगळे व्हर्जन. हो आता मारूती ८०० देखील इतक्या वर्षांनंतर कात टाकते, तर पांडू टाकणारच. पांड्याचे जाऊद्या तुम्हाला चांगंदेव माहित आहे का? औरंगाबादेतील बरीचशी घालमेल त्या चांगदेवासारखी. शिक्षणाची व शिक्षण संस्थांची ऐशी तैशी करणारे शिक्षण महर्षी व पॉलीटिक्स व एकूणच विद्यापीठातील भानगडी हे सर्व परत थेट चांगदेवासारखेच. फक्त तेवढे पाल्हाळ लावले नाही. तरी औरंगाबाद प्रकरणात १०० एक पाने खर्ची घातले आहेतच. आम्हास नंतर असे वाटले की पांडुरंगाच्या अस्वस्थपणात त्याच्या घरचे लोकं दिसत नाहीत, ते ओघाने पांडुरंगाचे कॅरेक्टर बिल्डींग साठीच येऊन जातात पण खंडेरावाच्या वेळी मात्र घरच्यांची सांगड घालून त्यात गावाची, गावकी-भावकीची भर टाकली आणि चांगदेवाच्या प्राध्यापकी, शिक्षकीपेशाची, हॉस्टेलच्या वातावरणाची फोडणी दिली की झाला खंडेराव अन पर्यायाने हिंदू तयार. चटणी म्हणून केवळ पुरातत्त्व येते. खरे तर नाव वाचून आम्ही हिंदू कडून खूप अपेक्षा वगैरे करून बसलो पण भलताच अपेक्षाभंग झाला.

खंडेराव हे नाव हिंदू, सिंधू संस्कृती हिंदू म्हणून हे नाव हिंदू. खंडेरावासारखाच कोणी इस्माईल खान असला असता तर कदाचित इस्लाम जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव आले असते असे प्रथमदर्शनी वाटणे साहजिक आहे. आणि खरेतर कुण्या एका अमेरिकन बॉबची कथा जरी अशीच वाटली तर ती अमेरिकन, जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव कोणी ठेवले तर वावगे नाही. तसेच पुस्तक प्रसिद्धी पूर्व चर्चेत हिंदू नावामुळे आले व त्यातच लेखक नेमाडे मग काय! मुलाखतीतून नेमाडे हिंदू धर्माबद्दल अनेकदा बोलले, रुढी परंपरांवर ताशेरे वगैरे ओढले, काही माहिती दिली जसे कृष्ण तीन होते वगैरे. आम्हास कादंबरी वाचून असे कळाले की हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी ! कादंबरीत काही वेगळेच येते. कारण आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो, पण किशन्या गावलाच नाही! वर तर वर खंड्याच मध्ये मध्ये बोअर मारू लागला.

त्यातल्या त्यात चांगली बाब अशी खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो उदा " अशा रितीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्‍या नागरी, ऐतखाऊ औद्योगीक व्यापारी संस्थेची भरभराट झाली" हे वाक्य आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेला अगदी लागू होतं. किंवा " आपला देश परदेश तर परदेश देश आपला" ही एखाद्या पुरातत्त्व चित्रा वरील खून उलटी किंवा सुटली वाचल्यावर येणारी गंमत आणि त्याचा गंभीर अर्थ किंवा प्रत्येक भारतातील प्रत्येक जातीचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य वगैरे वगैरे.

खंडेरावाला नुसत्या मुद्रा संशोधनात रस नाही तर त्याला त्या पाठी मागे असलेल्या मानवी विचारांच्या बद्दल संशोधन करायचे असते. जाणिवांच्या उत्क्रांती बद्दल खंडेराव बोलत राहतो. पण त्याचे गाईड त्याला तसे करता येत नाही असे सांगतात. सध्या पाश्चात्यांची इतिहासावर मालकी आहे, इतिहासात बंडल चालतात, पुरातत्त्व हे अस्सल. मडक्यावरच्या आकृत्या, मोंहजोदाडोला सापडलेल्या मूर्ती हेच खरे, तिथे बदल नाही आणि तेच खरे, तोच संस्कृतीचा पुरावा, असे त्याचे सर त्यास सांगू पाहतात पण खंडेरावास जाणिवांच्या उत्क्रातींवर काम करावे वाटते. आधी मातृसत्ता, पितृसत्ता नंत्तर कुटूंब, समाज, धर्म, विज्ञान पुढे काय? हे प्रश्न त्याला पडत राहतात.

कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व ते उत्तर असा विभागलेला आहे. पुढे कादंबरीत युरिया, बियाणे ह्यामुळे झालेली हरितक्रांती देखील मोहंजोदाडोच्या जोडीला येऊन बसते. त्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण पण आणतात. खंडेरावास गझल प्रकार आवडतो. गालिब, मिर असे सिद्धहस्त शायर व त्यांचे शेर तो मध्ये मध्ये आपल्याला सांगतो. त्याचे रूम पार्टनर चौघे चार जातीचे, त्यांच्या लकबी, विचार मध्येच येतात. पूर्ण कादंबरीच आठवेल तसे लिहिणे, असा बाज नेमाड्यांनी ठेवला आहे. तो कधी कधी बराही वाटतो. काही काही ठिकाणी अशक्य विनोद निर्मितीही आहे.

एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. आता ती समृद्ध अडगळ आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकास पडणे साहजिक आहे. आम्हास विचारले तर हो जर ती पूर्ण कादंबरी एकुण ३ एकशे पानांचीच असली असती तर कदाचित समृद्ध ठरलीही असती, पण खंडेरावाचे पाल्हाळ कधीकधी वाचायला बोअर होते अन ती त्या कादंबरीतील अडगळ नेमाडे दुर करू शकले नाहीत. बाराबलूतेदार, कुणबी मराठा, स्वायत्त ग्रामव्यवस्था, आणि हजारो वर्षे चालत आलेल्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या काही रूढी परंपरा ह्याचा आढावा नेमाडे घेतात. एकूण त्यांच्या लिखाणातून. 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' असा सूर दिसतो.

तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय समीक्षण केले? कादंबरी घ्यावी की नाही? गोची तीच तर आहे. हिंदू कादंबरी चांगली आहे, पण ती आमच्या अपेक्षेला (जी खुद्द नेमाड्यांनी अनेक मुलाखती देऊन वाढवून ठेवली) उतरत नाही. काही भाग खरचं चांगला उतरला आहे, पण पुनरुक्तिचा दोष स्विकारून पाल्हाळ लावले आहे हे आम्ही इथे सांगू इच्छितो.

प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. अडगळ वाढवण्यासाठी! हे समीक्षण आणि ती कादंबरी समृद्ध आहे की अडगळ हे तुम्हीच ठरवा.