हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ!

3

Written on 8:40 AM by केदार जोशी

भालचंद्ररावांनी हिंदूच्या मुलाखती द्यायला सुरूवात केल्यापासून हिंदू एकदम (प्रसिद्धी पूर्व) प्रकाशझोतात आली. आम्हास हिंदू वाचावी की नाही ह्याची चिंता लागलेली असतानाच विविध मान्यवर वाचकांनी व आम्हा सारख्या स्वघोषीत समिक्षकांनी हिंदू बद्दल भरपूर उलटसुलट लिहिले. आता उलटसुलट लिहिणे हे क्रमप्राप्तच आहे, काय करणार शीर्षकच हिंदू! उत्सायात्साते आम्ही हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ ६५० रू वजा टिच्चून १५ टक्के डिस्काउंट घेऊन मिळवली. आणि आम्ही बॅक टू द फ्युचर (की पास्ट? ) राईडीस तयार झालो.

हिंदू सुरू होते तीच मुळी मोठ्या स्वगतांतूनच. त्यातून आम्हास कळले ही खंडेराव नावाच्या कुण्या व्यक्तीची ही कहाणी. तो जातीने (आता हिंदू म्हणले की जात आली हे ओघानेच, ती द्विरुक्ती टाळून आम्ही जातच म्हणणार) कुणबी. मोप शेती बिती असलेला पण शेती करायची इच्छा नसलेला. खंडेराव घरातून श्रीमंत! अठरा प्रहर त्याचा खरी माणसांची ये-जा. पण गड्याला शिक्षणाची आवड. तो मोरगाव नावाच्या गावी राहतो, शिकतो, पूढे औरंगाबादेस येतो अन तिथे उच्चविद्याविभूषित होतो पण तरीही मनाने स्थिर नसतो. जाती व्यवस्था, पॉलीटिक्स, शेती की शिक्षण, घरची नाती आणि भारताचा पुरातत्त्व इतिहास हा सर्व गोंधळ त्याचा मनात कायम धुडगूस घालत असतो. त्यातच तो अचानक हिंदू संयुक्त कुटूंबाचा कुटुंबप्रमुखच होतो. मी जरा पुढेच गेलो. अन चार ओळीत हिंदूची कथाच सांगीतली नाही का? पण मग पास्टचे काय? तर ही कादंबरी वर्तमानातून भूत व परत वर्तमान अशी फ्लॅशब्याक स्वरूपात येते.

खंडेराव हा पुरातत्त्व विषयात पि एच डी करत असतो. आता पुरातत्त्व आले की आपण हडप्पा, मोहंजो-दाडो बद्दल बोलणार ही तुम्ही ताडले असेलच. अगदी तेच. उत्खननासाठी तो मोहंजो-दाडोला गेलेला असतो, तिथे त्याला वडील मरायला टेकले असल्याची तार येते आणि त्याचा सिंधू संस्कृती पासून परत मोरगावाकडे प्रवास चालू होतो. पाकिस्तान ते भारतातील मोरगाव एवढा मोठा प्रवास, त्यातच वडील आजारी म्हणजे वेळ जाता जाणार नाही, त्या प्रवासात त्याला आपले लहाणपण, भावंड, घरची माणसं, नाती-गोती, आला-गेला, बाराबलूतेदार, चिमणी-पाखरं, मोत्या-मुत्या, झीबू-ढबू , महार-मांग, पेंढारी-लभाने, होळकर-पेशवे, वेशीमधले-वेशीबाहेरचे, मराठा-कुणबी, वैदू-ब्राम्हण, तिरोनी आत्या ते चिंधी आत्या, मोरगाव ते औरंगाबाद, शेती ते पुरातत्त्वखाते, सिंधूसंस्कृती ते आजचे हिंदू हे सर्व आलटून पालटून त्याचा मनात पिंगा घालत असतात. पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा!! त्याचे मन हे असे धाव घेत असताना आम्ही त्यासोबत खंडेरावाचा प्रवास करत होतो. त्याच्या विचारातून मोरगाव सतत डोकावत राहते. त्याचे विचार केवळ शेती पुरते मर्यादित नसून ते विविध विषयांना स्पर्श करत असतात. उदाहरणार्थ तुलनेने अशिक्षित असलेल्या जातींमधील लैंगिक स्वातंत्र्य असो की भारतातील अनेक जमातींमधील स्त्रियांचे सामाजिक स्थिती, त्याची चिंधी आत्या नवर्‍याचा खून करते तो प्रसंग फारच मस्त उतरला आहे. चिंधी आत्याची घुसमट ही अनेक स्त्रियांच्या घुसमटीची प्रतिनिधित्व करते तर गावात असलेली लभानी वेश्या ही मुक्त असणार्‍या समाजाचे प्रतिनिधित्व करते. महार-मांग कुणब्याच्या शेतात काम करणारा भाग असो की विठ्ठलरावांनी गावाच्या उचापती सोडवण्याकरता केलेले लष्कराच्या भाकर्‍या भाजण्याचे काम असो, प्रत्येकाशी वाचक (खेड्यात न राहताही) रिलेट होऊ शकतो. आणि त्यामुळेच कदाचित हिंदू ह्या शब्दाचे प्रयोजन! ग्रामीण भागातील रुढी परंपरा व एकमेकांमध्ये गुंतलेली समाजाची अर्थव्यवस्था नेमाडे बर्‍यापैकी ताकदीने उभी करतात. बर्‍यापैकी लिहिण्याचं कारण बरेचदा पाल्हाळ लावले आहे, ते टाळता येते.

नेमाडे आपल्या त्याच त्या शैलीतून बाहेर येत नाहीत हे कादंबरी वाचताना प्रकर्षाने जाणवत राहते. उदाहरणार्थ
खंडेरावाचे व्यक्तीचे इंटर पर्सनल स्किल्स थेट आपल्या पांडुरंग सांगवीकरासारखे. आता हा पांडू कोण? हा प्रश्न तुम्हास पडला असेल. अहो पांडू म्हणजे आपला पिसपीओ. पांडूसारखेच खंडेरावास घरातल्या माणसाची घृणा (अपवाद त्याचा भाव भावडू) आई वडिलांबरोबर संबंध चांगले नाहीत, आई वडील पांडू सारखेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या आड येतात पण बंड करून खंडेराव आपले इत्सिप्त साध्य करतो, त्या घडामोडी थेट कोसलाच्याच, ते कारेपण, मनाशीच चाललेली कुस्ती ह्याची तुलना वाचक नकळत कोसलाशी करतो. नेमाड्यांनी खंडेरावाचे कॅरेक्टर पांड्यावरून उचलले असल्याचे जाणवत राहते. पण थोडे वेगळे व्हर्जन. हो आता मारूती ८०० देखील इतक्या वर्षांनंतर कात टाकते, तर पांडू टाकणारच. पांड्याचे जाऊद्या तुम्हाला चांगंदेव माहित आहे का? औरंगाबादेतील बरीचशी घालमेल त्या चांगदेवासारखी. शिक्षणाची व शिक्षण संस्थांची ऐशी तैशी करणारे शिक्षण महर्षी व पॉलीटिक्स व एकूणच विद्यापीठातील भानगडी हे सर्व परत थेट चांगदेवासारखेच. फक्त तेवढे पाल्हाळ लावले नाही. तरी औरंगाबाद प्रकरणात १०० एक पाने खर्ची घातले आहेतच. आम्हास नंतर असे वाटले की पांडुरंगाच्या अस्वस्थपणात त्याच्या घरचे लोकं दिसत नाहीत, ते ओघाने पांडुरंगाचे कॅरेक्टर बिल्डींग साठीच येऊन जातात पण खंडेरावाच्या वेळी मात्र घरच्यांची सांगड घालून त्यात गावाची, गावकी-भावकीची भर टाकली आणि चांगदेवाच्या प्राध्यापकी, शिक्षकीपेशाची, हॉस्टेलच्या वातावरणाची फोडणी दिली की झाला खंडेराव अन पर्यायाने हिंदू तयार. चटणी म्हणून केवळ पुरातत्त्व येते. खरे तर नाव वाचून आम्ही हिंदू कडून खूप अपेक्षा वगैरे करून बसलो पण भलताच अपेक्षाभंग झाला.

खंडेराव हे नाव हिंदू, सिंधू संस्कृती हिंदू म्हणून हे नाव हिंदू. खंडेरावासारखाच कोणी इस्माईल खान असला असता तर कदाचित इस्लाम जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव आले असते असे प्रथमदर्शनी वाटणे साहजिक आहे. आणि खरेतर कुण्या एका अमेरिकन बॉबची कथा जरी अशीच वाटली तर ती अमेरिकन, जगण्याची समृद्ध अडगळ असे नाव कोणी ठेवले तर वावगे नाही. तसेच पुस्तक प्रसिद्धी पूर्व चर्चेत हिंदू नावामुळे आले व त्यातच लेखक नेमाडे मग काय! मुलाखतीतून नेमाडे हिंदू धर्माबद्दल अनेकदा बोलले, रुढी परंपरांवर ताशेरे वगैरे ओढले, काही माहिती दिली जसे कृष्ण तीन होते वगैरे. आम्हास कादंबरी वाचून असे कळाले की हे सर्व त्या प्रसिद्धीसाठी ! कादंबरीत काही वेगळेच येते. कारण आम्ही तीन कृष्णांची कथा कधी येते ह्या उत्साहात्साते वाचत गेलो, पण किशन्या गावलाच नाही! वर तर वर खंड्याच मध्ये मध्ये बोअर मारू लागला.

त्यातल्या त्यात चांगली बाब अशी खंडेराव नुसतेच पाल्हाळ लावत नाही, पाल्हाळात कधी कधी समृद्ध बोलतो उदा " अशा रितीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषी संस्कृती परावलंबी होत गेली. याउलट, भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणार्‍या नागरी, ऐतखाऊ औद्योगीक व्यापारी संस्थेची भरभराट झाली" हे वाक्य आजच्या भारतीय कृषी व्यवस्थेला अगदी लागू होतं. किंवा " आपला देश परदेश तर परदेश देश आपला" ही एखाद्या पुरातत्त्व चित्रा वरील खून उलटी किंवा सुटली वाचल्यावर येणारी गंमत आणि त्याचा गंभीर अर्थ किंवा प्रत्येक भारतातील प्रत्येक जातीचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य वगैरे वगैरे.

खंडेरावाला नुसत्या मुद्रा संशोधनात रस नाही तर त्याला त्या पाठी मागे असलेल्या मानवी विचारांच्या बद्दल संशोधन करायचे असते. जाणिवांच्या उत्क्रांती बद्दल खंडेराव बोलत राहतो. पण त्याचे गाईड त्याला तसे करता येत नाही असे सांगतात. सध्या पाश्चात्यांची इतिहासावर मालकी आहे, इतिहासात बंडल चालतात, पुरातत्त्व हे अस्सल. मडक्यावरच्या आकृत्या, मोंहजोदाडोला सापडलेल्या मूर्ती हेच खरे, तिथे बदल नाही आणि तेच खरे, तोच संस्कृतीचा पुरावा, असे त्याचे सर त्यास सांगू पाहतात पण खंडेरावास जाणिवांच्या उत्क्रातींवर काम करावे वाटते. आधी मातृसत्ता, पितृसत्ता नंत्तर कुटूंब, समाज, धर्म, विज्ञान पुढे काय? हे प्रश्न त्याला पडत राहतात.

कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व ते उत्तर असा विभागलेला आहे. पुढे कादंबरीत युरिया, बियाणे ह्यामुळे झालेली हरितक्रांती देखील मोहंजोदाडोच्या जोडीला येऊन बसते. त्यातच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरण पण आणतात. खंडेरावास गझल प्रकार आवडतो. गालिब, मिर असे सिद्धहस्त शायर व त्यांचे शेर तो मध्ये मध्ये आपल्याला सांगतो. त्याचे रूम पार्टनर चौघे चार जातीचे, त्यांच्या लकबी, विचार मध्येच येतात. पूर्ण कादंबरीच आठवेल तसे लिहिणे, असा बाज नेमाड्यांनी ठेवला आहे. तो कधी कधी बराही वाटतो. काही काही ठिकाणी अशक्य विनोद निर्मितीही आहे.

एकूणच ही कादंबरी मराठी साहित्यातील अडगळ ठरते की काय आहे असे आमचे मत झाले. आता ती समृद्ध अडगळ आहे की नाही? हा प्रश्न प्रत्येकास पडणे साहजिक आहे. आम्हास विचारले तर हो जर ती पूर्ण कादंबरी एकुण ३ एकशे पानांचीच असली असती तर कदाचित समृद्ध ठरलीही असती, पण खंडेरावाचे पाल्हाळ कधीकधी वाचायला बोअर होते अन ती त्या कादंबरीतील अडगळ नेमाडे दुर करू शकले नाहीत. बाराबलूतेदार, कुणबी मराठा, स्वायत्त ग्रामव्यवस्था, आणि हजारो वर्षे चालत आलेल्या संस्कृतीमुळे निर्माण झालेल्या काही रूढी परंपरा ह्याचा आढावा नेमाडे घेतात. एकूण त्यांच्या लिखाणातून. 'हे जे काही कडबोळं आहे ते अगदीच वाईट नाही, थोडा धुळ झटकली तर फरक पडेल' असा सूर दिसतो.

तुम्ही म्हणाल की नक्की आम्ही काय समीक्षण केले? कादंबरी घ्यावी की नाही? गोची तीच तर आहे. हिंदू कादंबरी चांगली आहे, पण ती आमच्या अपेक्षेला (जी खुद्द नेमाड्यांनी अनेक मुलाखती देऊन वाढवून ठेवली) उतरत नाही. काही भाग खरचं चांगला उतरला आहे, पण पुनरुक्तिचा दोष स्विकारून पाल्हाळ लावले आहे हे आम्ही इथे सांगू इच्छितो.

प्रश्न उरतो मग आम्ही समीक्षण का केलं? सोपं आहे. अडगळ वाढवण्यासाठी! हे समीक्षण आणि ती कादंबरी समृद्ध आहे की अडगळ हे तुम्हीच ठरवा.

देवा तुझ्या दारी आलो

2

Written on 1:49 PM by केदार जोशी

ये देवा तुझ्या दारी आलो
गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा
जन्म जाई वाया

ऐ देवा दिली हाक
उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया

मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
वीर रसातील संगीत आणि आर्त आवाज. क्या कहने. अनुभूती अनुभूती म्हणतात ती हिच का?

[video:http://www.youtube.com/watch?v=IOmh7kUnirw]

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

0

Written on 11:06 AM by केदार जोशी

"दिल्ली झाली दीनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली
ताराबाईच्या बखते दिल्लीपतीची तखते
खचो लागली तेवि मते कुराणेही खंडली
रामराणी भद्रकाली रणरंगी कृद्ध झाली
प्रलायाची वेळ आली मुगलहो सांभाळा "


कवि गोविंद
मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.
मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु.

मराठेशाही सन १७०० ते १७०७

भद्रकाली खरी कोपली होती ती राजाराम ह्ययात असतानाच. पति जिंवत असतना ही बाई स्वतंत्र मोहीमा चालवायची व मोगलांना सळो की पळो करुन सोडायची. मोगली सरदार खाफीखानाने औरगंजेबाला एक पत्र लिहीले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा " ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहानी आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवर्याच्या ह्ययातीतच तिचा लौकीक झाला आहे."
राजारामाच्या मृत्यू नंतर ताराबाईने आपल्या सावत्र मुलाला संभाजीला गादीवर बसवले व राज्याची सर्व सुत्रे हातात घेतली. धामधुमीच्या काळात राज्यातच असल्यामुळे सर्व सरदार, हुकुमत्पन्हा, प्रतिनिधी हे तीचा सल्ला घेऊन चालायचे. गेली १८ वर्षे ( संभाजी गादीवर आल्या पासुन) सतत चालनारा मोगली, विजापुरी संघर्ष मराठ्यांचा जणू अंगीच पडला होता. १७०० ते १७०७ या कालखंडात शेकड्याने लढाया मराठी भुमीवर झाल्या पण त्याला समर्थपणे तोंड देऊन ताराबाईने राज्य जिंवत ठेवले ईतकेच नाही तर वाढविले सुध्दा.
राजाराम जायच्या आधीच मोगलांनी सातार्याला वेढा घातला होता. सात्यार्यासोबत पन्हाळा, विशाळगड, पावनगड अश्या अनेक गडांवर वेढे पडले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. ज्यांना सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा महाराष्ट्रातला भाग फिरुन माहीती आहे त्यांना कळेल की अवघ्या १५० किलोमिटर मध्ये हे सर्व प्रदेश येतात व स्वत ओरंगजेबासोबत १५०,००० सैन्य या भागात वावरत होते. सर जदुनाथ सरकार लिहीतात " किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलट मोगलाचेंच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येन्याजान्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येने अशक्य झाले होते." बघा म्हणजे मराठ्यांनीच मोगलांना घेरले अशी परिस्तिथी निर्मान झाली. हे धैर्य, ही जिद्द कुठन पैदा झाली?
विशाळगडच्या वेढ्यात बादशहाचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांसोबत, सह्याद्री व पाऊस ह्यांनी त्याला हैरान केले. शेवटी बेदारबख्तच्या मध्यस्थीने मराठ्यांना २ लाख रुपये दिले व किल्ला ताब्यात घेतला. अनेक किल्ले मरठ्यांनी मोगलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले व त्या पैशातुन फौज भरती सुरु केली. विशाळगडच्या मोहीमेत बादशहाची ६००० माणसे कामास आली ह्यावरुन मराठ्यांनी केवढा प्रतिकार केला हे लक्षात येऊ शकते. ह्या लढ्यामुळे हैरान होऊन बादशहा बहादुरगडास गेला पण तिथे त्याला नेमाजी शिंद्याने गाठले. बादशहाला बगल देऊन नेमाजी शिंदे माळव्यात घुसला. ३०,००० मराठ्यांनी खुद्द बादशहा दक्षिनेते असताना उत्तरेत हल्ला केला. भोपाळच्या उत्तरेला मोठी गडबड नेमाजीने ऊडवली. उत्तरेत घुसन्याचा पहीला मान ह्या नेमाजीला.
माळव्यात गडबड उडवुन दिल्यावर बाद्शाहाने रागात येऊन आणखी सैन्य आणले व एकाच वेळेस सिंहगड, तोरणा व राजगडला वेढा घातला. सिंहगडाने ३ महीने तोंड दिले. पण मराठ्यांनी नंतर ५०००० रु घेऊन किल्ला सोडला. बादशहाने किल्याचे नामकरन केले व "बक्षिंदाबक्ष" हे नाव सिंहगडास दिले. पातशाहा पुण्यास आला व तिथे सहा ते आठ महीने राहीला. फेब, मार्च, ऐप्रील १७०३ मध्ये अनुक्रमे वरिल किल्ले बादशहाकडे गेले. अनेक किल्ले लढत होते, जिथे माणूसबळ कमी पडत होते ते किल्ले पैसे घेऊन मोगलांना दिले जात होते.
तिकडे धनाजी जाधव आपल्या १५,००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेला व त्यांने बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद केले. भले शाब्बस. मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात वापस आला. (१७०६)

१५०,००० फौज, तोफा, हत्ती, घोडे काय वाट्टेल ते सोबत असुनही औरंगजेबास हार पत्कारावी लागत होती. ह्या सर्व गोष्टीमुळे तो अंत्यत निराश झाला होता. अल्लाकडे जास्त मदत होता पण अल्ला सध्या भद्रकालीच्या बाजुने होता त्यामुळे त्याला यश हाती येत न्हवते. मोगली लश्करातील एक आख्खी पिढी ( २५ वर्षे) त्याने दक्षिनेत राबविली पण कोरडाच राहीला. निराश होऊन तो २० फेब १७०७ रोजी वारला. तो वारल्या बरोबर राणीने अनेक चढाया मारत अवघ्या तिन महिन्यात सिंहगड, पुरंदर, पन्हाळा, सातारा, परळी हे व असे अनेक किल्ले जिंकुन घेतले व स्वराज्यात आणले.
बादशहा १३ नोव्हेंबर १६८१ ला दक्षिनेत आला. तेव्हा पासुन ते १७०७ ह्या २८ वर्षात मोगली नेतृत्वात एकदाही बदल झाला नाही. तो स्वत दक्षिनेत राहुन स्वार्या करत होता तर स्वराज्याचा नेतृत्वात तिन वेळेस बदल झाला. आधी संभाजी नंतर राजाराम व पुढे ताराबाई. एवढे बदल होऊनही त्या सम्राटाला स्वराज्य घेता आले नाही.
ताराबाईने महाराष्ट्रातील सर्वांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. कवि विठ्ठलदास लिहीतो
" पाटील सेटे कुणबी जुलाई
चांभार कुंभार परीट न्हावी
सोनार कोळी उदिमी फुलारी
या वेगळे लोक किती बेगारी"

ह्या लढाईत फार मोठी बाजु गनिमी काव्याने लढविली आहे. मराठे यायचे, हल्ला चढवायचे व पळुन जायचे, मोगल सरदार खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हारले. एका पत्रात मराठ्यांनी काय करावे हे लिहीले आहे व त्यानी काय केल आहे हे मल्हाररावाने मांडले त्या पत्रातील काही भाग देतो.
" आपले सैन्य थोडे. यास्तव मनुष्य राखून जाया होऊ न देता, मसलतीने त्यांचा सैन्यासभोवते हिंडोन, फिरोन त्यांस लांडगेतोड करावी; रयतेची मात्र वैरण राखुन रानातील वैरण जाळुन टाकावी: रसद चालु देऊ नये; आपल्या फौजेत मनाची धारन, त्यांचा लषकरात शेराची; अशा तर्हेने करीत मराथी फौज किती आहे हा अदमास ध्यानात येऊ देऊ नये .. मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, " मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे"

स्वतः ताराराणीने अनेक चढाया मारलेल्या आहेत. सैन्याची व्यवस्था, राज्यकारभाराची व्यवस्था, पैसा, गुजरात व माळव्यातील स्वारीची आखनी, किल्ले लढविने ह्या सर्व गोष्टींचा तिने निट मेळ घातला. वैध्यव्याचा नावाखाली रडत बसन्यापेक्षा तिने मराठी सैन्याच्या रक्तात जान फुकांयचे काम केले. १७०० ते १७०७ ह्या कालावधीत तिने स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहीला व धामधुमीच्या काळात मराठा राज्याची निट व्यवस्था लावली.
औरंगजेब मेल्यावर स्वस्त बसतील ते मोगल कसले. माळव्याच्या सुभेदारीवर आलेल्या आज्जम शहाने स्वतःला बादशहा घोषीत केले पण तिकडे शहा आलमचा विरोध मोडन्यासाठी तो लगबगीने उत्तरेत गेला. त्याने व झुल्फीकार खानाने ( जो गेली २० वर्षे दक्षिनेत होता) सल्लामसलत करुन शाहूला कैदेतुन मुक्त केले. ( ८ मे १७०७). शाहूला मुक्त करन्यामागे मराठेशाहीत फूट पडनार हे दिर्ध राजकारण त्या दोघांनी खेळले. शाहु हा संभाजीचा पुत्र असल्यामुळे तो दक्षिनेत जाऊन राज्य वापस मागेल व त्याला जिवत सोडल्याच्या उपकाराला जागुन तो मोगलांचा सांगन्यात राहील हे झुल्फीकाराला वाटले. ऑगस्ट २००७ ला शाहु अहमदनगर ला आला व त्याने तोच राज्याच्या खरा वारस असल्याचे घोषीत केले. मराठी राज्यात ठिनगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले.
ताराबाईला हे मान्य न्हवते. तिचे असे म्हणने होते की संभाजीच्या काळातील स्वराज्य आता नाही, ते आधी राजारामने राखले व सात वर्षे आपले छोटेस राज्य तिने स्वतः औरंगजेबाशी झुंज देऊन राखले. आज्जमशहाने टाकलेला डाव यशस्वी झाला. बरेच सरदार शाहु कडुन तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराबाई कडुन झाले. शाहुच्या म्हणन्यानुसार राजारामास राज्य राखन्या साठी दिले होते व राज्य राखने ऐवढेच त्याचे काम होत. स्वत राजाराम देखील तसेच माणत होता. पण जे राज्य ताराबाईने पुन्हा निर्मान केले त्यावर ताराबाई हक्क सोडायला तयार न्हवती. दोन्ही बाजुने प्रश्न सुटेना. सामोपचाराचा मार्गाने शाहुला आपल्याला राज्य मिळेल असे वाटले नाही व त्याने युध्दाची सुरुवात केली. धनाजी जाधव जो पर्यंत शाहुच्या पक्षात येनार नाही तो पर्यंत आपली जित नाही हे शाहूला उमजले. त्याने बाळाजी विश्वनाथला (पहीला पेशवा) धनाजीस आपल्या बाजुस वळवायला पाठविले. बाळाजी ते कार्य सफल केले. धनाजी शाहुला मिळाला. खेडला उर्वरित सैन्यात चकमक ऊडाली पण त्यात शाहू विजयी झाला. या विजयामूळे त्याचे धैर्य वाढले. सेना ही वाढली.
कान्होजी आंग्रेने बंडावा करुन स्वराज्यातले काही किल्ल्यांवर कब्जा केला व प्रतिनिधीस अटक केली. शाहुने ते बंड मोडन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पेशवेपद देऊन पाठविले व पेशवा ते कार्य यशस्वी करुन आला.
सर्व मोठे सरदार, महत्वाचे किल्ले शाहू कडे आल्यामुळे ताराबाईची बाजु लंगडी पडली. तिने वारंवार शाहूशी भांडन मांडले पण ते पुर्ण झाले नाही. होता होता शाहूच बळकट झाला. १२ फेंब १७०८ रोजी शाहूने राज्याभिषेक केला तो स्वतः छत्रपती असल्याची द्वाही फिरवली.

इकडे ही धामधुम चालत असताना तिकडे उत्तरेत आज्जमशाहा व शहा आलमचे युध्द झाले त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी धारण करुन तो पातशाह बनला. पण कामबक्षाला तो बादशहा म्हणुन मान्य न्हवते, त्याला स्वतःला बादशहा व्हायचे होते. बहादुरशहाने कामबक्षा विरुध्द शाहूची मदत मागीतली. नेमाजी शिंदे बहादुरशहाकडुन लढला. ही मदत देन्यामागे शाहूला असे वाटत होते की आज्जम शहा ने जे कागदपत्र त्याला दिले त्यावर ह्या नविन बादशहाची मोहर लावता येईल. १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. अहमदनगच्या मुक्कामात त्याला मरठ्यांकडुन गदादर प्रल्हाद भेटायला गेला व त्याने बादशहास दक्षिनेची चौथाई मागीतली. झुल्फीकारखाणाने ही मागनी उचलून धरली. त्याला परत युध्द नको होते. याच सुमारात कोल्हापुरहून ताराबाईची लोक बादशहाला भेटायला आली व त्यांनीही चौथ मागीतली. ही मागणी झुल्फीकारखाणाचा प्रतिस्पर्धी पण बादशहाचा वजीर मुनीमखान याने उचलुन धरली. बादशाहाने निर्णय दिला की आधी वारसा हक्काचा निकाल लावा मग मी सनदा देतो. सनदांचे कार्य अपुरेच राहीले. शाहू आणि ताराबाई यांनी आपसात युध्दाला सुरु केली. १७०९ साली तो वापस दिल्लीला गेला व २६ वर्षांनंतर थोडीफार शांतता मराठी राज्यास लाभली.
सत्ता शाहूकडे न जाता ताराबाईकडे राहीली असती तर वेगळे काही घडले असते का ह्याचे उत्तर मात्र मिळनार नाही कारण ईतिहास फक्त घडलेल्या घटनांचाच विचार करतो. जर, तर ची मात्रा ईथे उपयोगी नाही. शाहूने शक्यतो सांभाळुन राहन्याचा प्रयत्न केला. तो एक व्यक्ती म्हणून निश्चीतच फार मोठा होता. त्याने कोल्हापुर व सातारा ह्या दोन्ही गाद्या एकत्र आणन्याचा विफल प्रयत्न केला पण ते जमले नाही.
पुढे महाराणी ताराबाईचे तिच्या सावत्र मुलाशी पटेना झाले। कोल्हापुरकर संभाजी तिचे ऐकेनासे झाला. शाहू ने त्याला मात दिली व ताराराणीस घेऊन तो सातार्यास आला. मध्ये तिने आणखी एक औरस वारस पैदा करन्याचे नाटक केले पण ते उघडे पडले. १७०० ते १७०७ मराठी राज्यावर सत्ता गाजविनार्या ताराबाईला नंतर घरकैदेत राहावे लागले. तिचा मृत्यू सातार्यास शाहू कडेच झाला. एका शुर बाईचा दुर्दैवी अंत झाला. तिने मराठी राज्यासाठी जे केले ते आधी शिवाजी महाराजांनी नंतर संभाजी व त्यांनंतर राजारामाने केले. तिच्या सोबतच भोसले घरान्यातील मर्द लोक संपले असे खेदाने मला नमुद करावे वाटते. तिचे व तिच्या नवर्याचे कार्य मराठी राज्यासाठी फार मोलाचे होते.

संदर्भ : मराठ्यांचा इतिहास अ रा कुळकर्णी.

टेन्शन नै लेने का मामू

1

Written on 2:35 PM by केदार जोशी

ए, अरे थांब, थांब। छ्या हा माणूस ह्या जन्मात कधी ऐकनार नाही. कितीदा सांगितले की मीठ वरुन नको घेऊस? ऐकनार आहेस की नाही?
अगं पण, मी थोडेच घेतोय आणि मला माझी स्वतःची काळजी नाही का?
मोठा आलाय काळजी घेणारा, नाहीतर आज ही वेळ आलीच नसती.
ही वेळ म्हणजे काय? च्यायला, माझ्याच घरात, माझ्याच पैशाने मला मीठ खायला बंदी म्हणजे फार झाले.
ही बंदी आधी पासून असती तर मला सारख ओरडाव लागलं नस्त.
(मनात, आता बायको माझ्या घरच्यांचा उध्दार करणार) पण तू कशाला ओरडतेस. अगं थोडंसच घेतोय की.
घे. घे. अस कर ही पुर्ण मिठाची बाटली मी तुला देते.
अगं पुर्ण नाही, थोडेच दे.
(खस्सकन माझे ताट ओढन्यात येते आणि मी चामत्कारिक रित्या इकडे तिकडे पाहतोय.)
तुझ्या आईनेच तुला लाडावुन ठेवले त्यामुळेच झाले हे.
आईचा ह्यात काय संबंध. गेले १५ वर्ष मी आई पासुन लांब राहतोय.
त्यांचाच संबंध आहे. सारख घरात तिखटाचे खाणे तुमच्या घरी. आणी मीठही सढळ.
काहीही काय? च्यायला तुम्ही कधी चमचमीत खाल्ल नाही त्याला आम्ही काय करनार?
आलासना परत आम्ही वर.
दहा वर्षे होत आलीत पण 'आम्हीच' ..... .... ....
प्च्च। प्च्च. अगं तसे नाही काही, मी आपल उदा दिली. ( भाड्यांची आदळ आपट होण्यास आता कधीही सुरु होउ शकते).

लोकहो, हा आजकालचा रोजचा संवाद झालाय. म्हणजे सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस ह्या मिठाने माझे घोडे मारलेय.

झाल काय की ( थोडा फ्लॅशबॅक) त्या दिवशी सॅम्स कल्ब मध्ये बी पी चेक करन्याचे मॉनीटर दिसले म्हणून अस्मादिकांनी मोठ्या स्टाईलीत त्या मशीनमध्ये आपला हात घातला। तर अहो आश्चर्यम, १४७ / ९८ असे रिडींग आले. मी पटकन ते इरेझ करनार इतक्यात सौ तिथे आली आणी तिने हे आकडे पाहिल्यावर बडबड सुरु केली. मग परत दुसरेंदा रिडींग घे अशी आज्ञा आल्यावर मी परत सावरुन श्वासाच्या गतिवर नियत्रंन ठेवत परत एकदा सर्व सोपस्कार पार पाडले. परत एकदा १३२ / ९६ असे रिडींग आले. मी सावरुन म्हणालो, "अंग,बघ हे मशीनच फॉल्टी होत बहुतेक"

छ्या। अरे रिडींग मध्ये १० ते १५ पर्यंत फरक पडू शकतो असे मशीनवरच लिहीलय की. इती सौ.
बरं, एवढ काही खास नाही मग। ते ९६ परत खाली जाईल आणी नॉर्मल वर येईल.
काही येत नाही। तुझी लाईफस्टाईल पाहिलीस का?
म्हणजे? आता वाइफस्टाईलचा काय संबंध.
वा? अरे .ला.ला.
(सावरुन) हो अग ला च.तुला काही म्हणायची हिंमत आहे का माझ्यात. ती लग्नाच्या दिवशी पर्यंतच होती.

(मनात : झक मारली आणी त्या यंत्रात हात घातला. आता ही बाई ते समोसे, कचोर्‍या बंद करनार, ठिके रात्री ऑफीसमधून येतानाच समोसा वैगरे खाउन यायचे आता, उगीच कटकट नको आणी ते ईंडो चायनिज आता थोडे कमी केले असा आभास तरी निर्मान करायला पाहीजे. )

काय म्हणलास?
काही नाही. आता जरा लक्ष ठेवावे लागेल खान्याकडे.

कट टू
मित्राच्या घरी गेलो होतो। त्याचा रुटीन चाचनीचा रिपोर्ट तो मला सांगत होता. कॉलेस्ट्रॉल वाढलेय रे. आता भात बंद करतो मी - मित्र
हो रे, तुला लक्ष द्यावे लागेल जरा खाण्याकडे.
अन तुला? - आमच्या सौ.
मला? मला काय झालयं।
अरे, ह्याने सॅम्स मध्ये बी पी चेक केले होते तर तिथे १४५-९८ अश्या टाईपच्या त्याचा रिडींग होत्या.
१३२
त्याने काय फरक पडतो?
आँ.
म्हण्जे १०-२० इकडे तिकडे असे लिहीलेय तिथे
पण केदारचा रिपोर्ट दोन महिन्यांपुर्वी तर नॉर्मल होता की। रोज १२-१४ मैल सायकल चालवतो म्हणे तो. (तेल ओतने म्हणतात ते हे.)
अब्बे ये। म्हणे नाही खरच. रोज व्यायाम वैगरे करतो मी.
अरे पण तू सगळे अशातच चेक केले होते की अन बी पी, कॉलेस्ट्रॉल सर्व नॉर्मल आले होते की. तू डॉक्टर कडे जाउन ये. - मित्र

कट थ्री
डॉक्टर कडे भेट दिली. तिथेही खालच्या आकड्याने घोळ घातलाच. तुम्ही ड्रिंक्स कमी करा. - मी घेत नाही.सिगारेट - नाही ती पण नाही.व्यायाम करा. अहो, पण मी रोजच करतो.झोप येते का? हो मग खर तर काही कारण नाही तुम्हाला हायपरटेन्शनची. (मी गप्प)
अस करा ह्या गोळ्या १० दिवसांनंतर चालु करू. पण तो पर्यंत तुम्ही रोज सकाळी व संध्याकाळी बी पी चेक करा। ते चेक करायचे यंत्र आणायला मला ५० डॉलरचा भुर्दंड पडला तो वेगळा.

त्या बी पी च्या तर. आयला ह्याने माझे मिठ खाणेच बंद केले आहे. रोज सकाळ संध्याकाळ सध्या ते मॉनीटर चालू आहे. आणी बी पी च्या नावाखाली सप्पक खाणे सुरु झाले आहे. एवढेच नाही तर आता माझ्या सारख्या ऍक्टीव्ह माणसाला स्टेज टू बी पी होत असल्यामुळे ( अजुन झाला नाही, पण आकडे तसे दाखवतात, त्याला मी काय करु) रोज घरच्यांचे फोन, मित्रांचे सल्ले ह्यामूळे जिव मेटाकुटीला आलाय.

ते रिडींग तर काही दिवसात नॉर्मलला येईलच. पण तो पर्यंत एकच मंत्र, " टेन्शन नै लेने का मामू"

धर्म म्हणजे काय?

2

Written on 7:46 PM by केदार जोशी

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?
पाहिलंत किती प्रश्न पडले ते?


वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे. "a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"


ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते। धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.


हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.
"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"
विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.
जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो। जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.


कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात।

१ त्या धर्माचे तत्वज्ञान

२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड
नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.
वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.
आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.
देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.
विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man।" And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".


वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.
उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही। पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.


धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही। पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.


ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता

मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि

वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी:

अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि

सत्यं वदिष्यामि तन्मामवतु

तद्वक्तारम्वतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम्

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:


अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.
वेदांनुसार ब्रह्म म्हणजे काय हे पुढे कधीतरी ..

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट

0

Written on 1:03 PM by केदार जोशी

सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदतगट


'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल. आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न --

मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश:


पुढे काय?


हे सर्व वाचन्यासाठी व सुंपथ बद्दल अधिक अधिक माहीतीसाठी http://supanth.blogspot.com इथे भेट द्या.
हा उपक्रम चालु करनार्‍यांपैकी मी एक आहे.
You have to be part of the system, to chage it. तूम्हीही सहभागी व्ह्या.
संपर्कासाठी supant.madatagut@gmail.com वर संपर्क साधता येइल.

अहं ब्रम्हास्मि

0

Written on 2:38 PM by केदार जोशी

मय्येव सकलं जातं मयि सर्वं प्रतिष्ठितम

मयि सर्वं लयं याति तदब्र्म्हाद्वयमस्म्यहम १९

माझ्यातच सर्व गोष्टींचा जन्म आहे, माझ्यातच त्यांचे अस्तित्व आहे आणी माझ्यातच ते सर्व विलीन होतात. मीच तो "ब्राम्हण" आहे.

अणोरणीयानहमेव तद्वनमहानहं विश्वमहं विचित्रम

पुरातनोSहं पुरूषोSहमीशोहिरण्यमयोSहं शिवरुपमस्मि २०


अर्थात
अणूपेक्षाही लहान असनारा मी ह्या ब्रम्हांडापेक्षाही मोठा आहे। मीच हा विश्वविधाता आहे, मीच तो पुरातन पुरूष आहे, ज्याचा हातात सर्व सत्ता आहे. कारण मी च तो पवित्र शिव आहे.



अपाणणिपादोहम्चिन्त्यशक्ति:पश्चाम्य्चक्षु: स श्रॄणोम्यकर्णः

अहं विजानामि विविक्तरुपोन चास्ति वेत्ता मम चचित्सदाहम २१


मला हात आणी पाय नाहीत। मी डोळे नसतानाही पाहतो आणि कान नसतानाही ऐकतो. मलाच सर्व ज्ञान आहे पण माझे अस्तित्व (ज्ञान) कोणालाही नाही कारण मी च ते पवित्र ज्ञान वा अंतिम सत्य आहे.



वेदैरनेकैरहमेव वेद्योवेदान्तकृद्वेदविदेव चाहम

न पुण्यपापे मम नास्ति नाशोन जन्म देहेन्द्रिय बुध्दीरस्ति २२



सर्व वेद हे "मी" कोण आहे हे सांगन्यासाठीच निर्मान केलेले आहेत वेद, उपनिषीद व वेदान्त हे मीच निर्मान केले आहेत. मला अदि नाही ना अंत, माझा जन्मही झाला नाही वा मॄत्यूही होणार नाही.



न भूमिरापो न च वह्निरस्तिन चानिलो मेSस्ति न चाम्बरं च

एवं विदित्वा पमात्मरुपंगुहाशयं निष्कलमद्वितीयम २३

समस्तसाक्षिं सदसद्विहीनंप्राति

शुध्दं परमात्मरुपम २४


अर्थात
माझ्यासाठी भूमी नाही ना ही पाणी, अग्नी वा वायू. हे काहीही नाही. मला अस्तित्व आहे आणी अस्तित्व नाहीही कारण मीच परमात्मा आहे.
वरिल श्लोक हे कैवल्योपनिषादातून घेतले आहेत.
काल परवा नेट वर भटकताना सोनल देशपांडेच्या ब्लॉग वर निर्वाणषटका वरिल विवेचन वाचले. सोनल धन्यवाद. बहुत दिनांपासुन वरिल श्लोक लिहून काढायचे होते पण ते जमले न्हवते. आजच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही तरी वेगळे लिहायला मिळाले.


वरवर पाहाता ह्या ओळी काहीही जास्त सांगत नाहीत. पण खोलात जाउन विचार केला तर त्याचा अर्थ सांगायला पाने अपुरी पडतील म्हणून मी थोडक्यात लिहीले. तेवढी माझी योग्यता नाही.