मंगेश पाडगावकर

0

Written on 10:14 AM by केदार जोशी

पाडगावकरांना महाराष्ट्र भूषनाने महाराष्ट्र सरकारने भूषविले. हे जरा मला सध्याच्या वातावरनात वेगळेच वाटले. कारण विचारता, अहो पाडगावकर, फक्त मराठी(तच) लिहीतात हे सरकार विसरले की काय असा मला संदेह येत आहे.

पाडगावकर मला तूमची आमची भेट कधी झाली हे खरच स्मरत नाही. तूम्ही लहानपनापासूनच भेटत गेलात. लहानपणी कधी तरी घरच्यांसोबत तूमचे "भावनांचा तू भुकेला रे" ऐकले आणी ते ऐकता ऐकता झोपी गेलो असे आमच्या मातोश्री सांगतात. ती जादू तूमची होती की लता मंगेशकरांची हे कळलेच नाही. तेव्हा ते वयच न्हवतें ते, मग आईने सांगीतले की अरे हे "आपले" पाडगावकरं. तिथे तूम्ही जे आपले झालात ते अजुनही आपलेच राहीलात.

कळत्या वयातं तिच्या कडे पाहताना तूमचे लाजुन हासने अनं ची नेहमीच आठवन व्ह्यायची पाडगावकर. वाटायच पाडगावकर नसते तर माझ्या ह्या भावनांना कोणी ओळखले असते.

पुढे कधी तरी जेव्हा सर्वांचे "प्रेम सेम नसते" हे ऐकले तेव्हां वाटल की, बास हेच माझे गाणें असनार. आणि आपले गाणे, आपणच गायचे हे तेव्हांच ठरवीले. मैत्रीनी बरोबर बसलो की "संथ निळे हे पाणी" आठवायचे. तेव्हां वाटायचे तो शुक्राचा तारा कधी संपूच नये. हेच हेच चित्र राहावें. नेहमीसाठी. पुढे जेव्हा मैत्रीनीने "मामा" बनवले तेव्हा तूमच्याच "अखेरचे येतील माझ्या" चा खरा अर्थ कळला.
पाडगावकर तूम्ही मला जळी-स्थळी भेटत असता. भरधाव वेगाने जेव्हा मी अमेरिकेतील रस्त्यांवरून गाडी हाकत असतो तेव्हा तूमच्याच कविता, भावगीत रुपाने माझ्या गाडीत वाजतात. त्या रस्त्यांचे भाग्य आहे पाडगावकर साहेब, कारण अशी वंदता आहे की आवाजाच्या लहरी खुप काळ तिथेच राहतात. कोणी जर पुढे मी गेलेल्या रस्त्यावरुंन ते लहरी ओळखायचे मशिन फिरवले तर त्याला रेडीओ लहरीत तूमची गाणी ऐकायला मिळतील व त्याचं जिवन सार्थकी लागेल.

तूमचा जिवनाचा दृष्टीकोण काय ह्याचाशी आम्हा रसिकांना काही घेनेदेणे नाही, नसावे. आम्हाला फक्त तूमच्या कविता हव्यात, मग त्या मोरूच्या असोत वा बोलगाणी असोत. कारण अहो या जिवनावर प्रेमं करायला आम्हाला तूम्ही शिकवलत.

तूम्ही आणि खळे काकांनी जे मला दिलयं, मला नाही वाटत त्यांच ऋण मी फेडू शकेन. तूम्हाला तूमच्याच कवितेने माझा "सलाम"
संथ निळे हे पाणी वर
शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी
तेथे अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मौनाचा गाभारा

शाळा

5

Written on 11:21 AM by केदार जोशी

"शाळा" वाचून संपले पण नंतर मनात सुरु झालेली शाळा काही संपत नाही. मिलिंद बोकीलांनी प्रत्येकांचा शाळेतल्या आठवनीनां परत एकदा जागे केले.सुर्‍या, चित्र्या, जोश्या, बिबीकर, फावड्या हे फक्त कथेतील पात्रंच नसल्यामूळे आत पर्यंत भिडले. माझ्यातला जोश्या मला परत एकदा दिसला, तर माझ्यातल्याच अर्धवट मेलेल्या सुर्‍याची आठवन झाली. कधी कधी तो जागृत होतोच. :) शाळेतला प्रत्येक मुलगा कधी ना कधी तरी वरिल पात्रांपैकी एक असतोच.

माझ्याही शाळेत असे प्रसंग घडलेले आहेत, कित्येकदा मीच त्यात होतो, त्यामूळे लहानपण परत एकदा आल्याचे जाणवले. मी क्रिकेट खुप चांगला खेळायचो, (असे मित्रांचे म्हणने) म्हणून आमच्या शाळेच्या टिम मध्ये तर होतोच. एकदा प्रॅक्टीस करताना कळले की एक नविन क्लब निर्मान झाला, तिकडे कॉलेजची मुलं खेळायची, त्यांचात चांगल्या लोकांना भरती करत आहेत हे कळले. मग आस्मादिक तिकडे गेले. तेव्हा मी आठवित होतो. ते आधी मला घ्यायलाच तयार न्हवते बाबापुता केल्यावर ये म्हणाले. मला पुर्ण सरावापैकी २/३ ओव्हर्स बॉलींग व थर्ड मॅनला शोभेल अशी फिल्डींग दिली. पण त्यांचा सरावाच्या वेळा ठराविक होत्या. त्यांच कॉलेज दुपारी संपायच व लगेच ते ग्राऊंडवर जायचे. आली का पंचाइत, कारण माझी शाळा दुपारी होती. मग काय दोन महीने मी रोज शाळेत जायला तर निघायचो पण पोचायचो ग्राऊंड वर आणि क्रिकेट खेळायचो. शाळेत डाउट येउ नये म्हणून मी बनावट पत्र शाळेत मुख्याध्यांपकांना पाठवून दिले की मला काविळ झालाय व मी शाळेत येउ शकनार नाही. यथावकाश घरी गोष्ट कळालीच व मुख्याध्यापकांकडे हजेरी लावावी लागली.

पण महाराजा खरी गम्मत पुढे आहे. शाळेत गेल्यावर मी ही बनवून सांगीतले की मला रोज भाकरी आणि घट्ट वरन हेच खायला लागयाचे, हे सांगीतल्या बरोबरच सविता कुलकर्णीचा, तिच्या नकळत जोरात निघालेला प्ल्च स्सSSSस्स ऐकायला मिळाला आणि अस्मादिकांना कळले की सविताची आपल्यावर लाइन आहे. हे ऑफर्कोर्स अन्याने पटवून पटवून सांगीतले त्यामूळे अन्याची बहुतेक डिडी वरची लाइन क्लिअर होणार होती. कारण डिडी माझ्याशी फार बोलायची, आणि अन्या घुम्याला ते काही जास्त आवडायचे नाही. ह्या डिडीचाही जाम घोळ होता. ती होती 'अ' मध्ये आणि आम्ही क मध्ये पण ती असायची आमच्यातच. 'अ' वाले पोर बेखुब होते. तेव्हा 'क' बॅच आणि 'ड' बॅचच हुशार होती. १० वीत ड ची पोरगी मेरीटला आली. आनंद आणि अन्या शेजारीच राहायचे. डिडीवर आनंद मरायचा पण डिडीने त्याला भाव दिला नाही. डिडी नेहमी अन्याच्या घरी पडिक. ते जवळच राहायचे पण तरिही. अन्या बावळट निघाला, नंतर उगीच घाबरुन बहिन बहिन खेळत बसला आणि चान्स गमावला. नाहीतर अन्या आणि डिडी मस्त जोडी होती. माझी आवडती. आणि अन्यामूळे मी डिडीला सोडले, साल्या अन्यावर जाम राग आहे माझा.

लाइन आहे हे कळाले पण पुढे काय? हा प्रश्न होता. आम्ही ना धड अन्यासारखे अतिहुशार ना धड केश्यासारखे पांडू त्यामूळे गोची झाली होती. दिवस असेच जात होते. त्या नसलेल्या काविळामूळे मला मात्र जोरदार भाव मिळाला होता. क्रिकेटची प्रगती शाळेमूळे खुंटली असली तरी शाळेच्या टिम मध्ये आपली वट होती. एके दिवशी मी मॅच मध्ये बॉलीग केल्यावर ९ वी ब मधल्या अभोर्‍यांने जोरात स्ट्रेट ड्राईव्ह मारला. तो अंभोर्‍या आणि बळवतं पाटील साले राक्षस होते. एक टप्पा पडून तो बॉल माझ्या गळ्यापाशी लागला. मला तो अडवताच आला नाही. मी जोरात पडलो व खेळ थोडावेळ थांबवावा लागला. मिल्याने नंतर सांगीतले की सविता मॅच बघता बघता रडायला आली होती. त्यामूळे मी आनंदीत झालो होतो पण अजुनही प्रगती न्हवतीच.
९ वी च्या गॅदरिंग मध्ये मी दोन वैयक्तीक बक्षिस मिळवली. एक वक्तृत्व स्पर्धेत व एक निबधंलेखण. सवडी व तिच्या मैत्रींनी मिळून एक पेन भेट दिला. मैत्रींनी फक्त नावालाच. सवडीचेच पैसे असनार, कारण तो चायनिज इंक पेन होता. तेव्हा ४० रु ला भेटायचा. त्या मैत्रीनी कशाला देतात काही? ति देखील सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची त्यामूळे सोबत नेहमीच होती. आमच्या शाळेत मुलं मुली एकमेकांना बोलत, त्यांचा घरी जात. वा सोबत गृपने पिक्चरलाही जातं त्यामूळे काही प्रॉब्लेमच न्हवता.
एक वर्षभर असेच निघून गेले. सवडी बोलायची मात्र खुप. सारखी आपली बडबड बडबड. त्या चिमन्यांसारखी. १० वीला वह्यांची देवान घेवान घरी येने जाणे सारखे असायचे पण सांगायची वा पत्र द्यायची आपली व तिची डेरींग काही झाली नाही. तेव्हां गरजच वाटली नाही.
नंतर सविताच्या मैत्रीनेने मात्र एका दिवशी येउन सांगीतले की सविताला अन्याने सांगीतले. (च्यायला हा अन्या माझ्या जिवावर उठला होता कारण त्या काळात बहुतेक डिडी अन्यावर चिडली ) काहीतरी बंदोबस्त करन्यासाठी मग मी अग तसे काही नाही असे गडबडीत म्हणालो, पण तिला माझ्याक्डून बहुतेक 'हो' ऐकायचे होते. गडबड होगई. तिची चिडचिड झाली आणि तिने मला बोलायचे कमि केले किंवा अभ्यासामूळे तसे झाले. १० वी झाली आणि नंतर सविताचे आणि माझे कॉलेजच वेगळे झाले. १२ वी नंतर ती औरंगाबादला निघुन गेली.
आम्हा सर्व मित्रांची मैत्री अजुनही टिकून आहे. भेटल्यावर परत एकदा ह्या सर्व गप्पांची उजळनी वर नंतरच्या मैत्रींनीच्या गप्पा एकदा होतातच. आताही सविता भेटते पण फक्त आठवनीत. तिलाही मी नक्कीच भेटत असनार. असाच जुन्या मित्रांच्या शाळेच्या गप्पांत.

द ग्रेट मराठाज

3

Written on 8:36 AM by केदार जोशी

मराठ्यांचा म्हणजे आपला इतिहास वाचायची खुमखुमी प्रत्येकाला असते पण काय वाचावे हे न कळल्यामुळे आपण प्रकाशित कादंबर्‍यांनाच "इतिहास" समजतो. यात आपले मत पुर्वग्रहदुषीत होन्याचा फार संभव असतो. अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की कादंबर्‍या वाचने चुकीचे आहे. ऐतीहासीक कादंबरी तो कालखंड त्या व्यक्तीच्या व लिहीनार्‍या व्यक्तीच्या दॄष्टीने सांगत असते आणि यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होऊ शकतात. पण ह्या कादंबर्‍या सामान्य वाचकांना ईतिहास सांगू पाहातात हे ही नसे थोडके.
मला इतिहास समजावून घेताना खालील पुस्तकांची मदत झाली. ती यादी मी देत आहे. ही यादी पुर्ण नाही. (कारण पुर्ण होने शक्य नाही). यात मला आवडलेल्या, महत्वांचा पुस्तकांची नावे आहेत, ज्यातून वाचकाला मराठ्यांच्या इतिहासाचा मागोवा घेता येईल.

कादंबर्‍या
छत्रपती शिवाजी
श्रिमान योगी.
छावा
संभाजी
छत्रपती संभाजी
राऊ
मंत्रावेगळा
पानिपत
स्वामी

ऐतीहासीक पुस्तकांची यादी -
मराठी रियासत - गो.स.सरदेसाई ( जुने खंड १ ते ४५ पण ते नविन संपादित कमी केले आहेत)
इतिहास संग्रह - भाग १ ते ७, संपादक पारसनिस.
मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे
शिंदेशाही इतिहासाची साधने - संपादक आनंदराव फाळके. ( पानिपत साठी उपयोगी)
मराठ्यांचा इतिहासाची साधने खंड १ ते ६ - संपादक वि का राजवाडे
ऐतीहासीक पत्रव्यवहार. गो.स.सरदेसाई, कृ पा कुलकर्णी
बाळाजी बाजीरावची रोजनिशी - संपादक पारसनिस.
मोगल मराठा संघर्ष - सेतु माधवराव पगडी
श्री छत्रपती शिवाजी - शेजवलकर
श्री छत्रपती महाराजयांचे चिकीत्सक चरित्र्य - वा सि बेंद्रे
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य - वा सि बेंद्रे
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे.

ईंग्रजी पुस्तकं
A History of the Mahrattas Volume 1, 2 and 3 James Grant Duff ( अमॅझॉन वर हे अजुनही मिळते)
The Marathas 1600-1818 -The New Cambridge History of India by Stewart Gordon
History of Aurangjeb - Sir Jadunath Sarkar
Military History of India - Sir Jadunath Sarkar
Rise of the Maratha power, and other essays, by M.G. Ranade
Marathas and the Marathas country by A. R Kulkarni
The second Maratha campaign, 1804-1805: Diary of James Young, officer, Bengal Horse Artillery, and twice sheriff of Calcutta by James Young
ही काही पुस्तक। यातील बरिच सहज उपलब्ध नसतात तर काही महत्वाची अजुनही प्रकाशनात आहेत। अप्पा बळवंत (पुणे) मध्ये बहुतेक सर्वच मिळतील पण काही अमेरिकेतही सहज मिळू शकतील. ( जसे ग्रांट डफ). वरिल पुस्तके ही खास करुन मराठ्यांचा इतिहासाचीच आहेत, ह्यात मी केम्ब्रींज हिस्ट्री ऑफ ईंडिया सारखी प्रकाशने टाळली आहेत कारण ती पुर्ण भारतासाठी आहेत.


ही यादी निश्चीतच अपुर्ण आहे पण इतिहास वाचकासांठी भरपुर होईल. मला स्वतःला मराठी रियासत व मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे हि दोन पुस्तके जास्त आवडतात कारण ह्यात भरपुर माहीती सोप्या व सहज शैलीत दिली आहे.