रॅन्डम मेमरीज -५
Written on 3:14 PM by केदार जोशी
८ वी मध्ये असताना शाळेत कोणीतरी मोठे पाहूने आले होते. मला त्यांचे नाव आता आठवत नाही, पण वर्गशिक्षकांनी य वेळा बजावल्यामूळे हे लक्षात राहिले. तर त्यांचा समोर निवडक विद्यार्थीच भाषन ठोकनारं होते. त्यात मास्तराने माझा नंबर लावला. आली का पंचाईत? निम्मीत होते स्वातंत्र्यदिनाचे.
मी विषय काय घ्यावा म्हणून विचार करत होतो. इतक्यात कुणीतरी सुचविले की तू सावरकर किंवा नेताजी वर बोल. हे असे सुचवने सोपे असते पण त्यांचावर तेंव्हा बोलाय इतकी अक्कल न्हवती. तशी आत्ताही नाहीच.मग अस्मादिक तयारी करायला लागले. कोणावर जास्त वेळ बोललो ते आता आठवत नाही. पण इतर घटनाच आठवतात. माझा नंबर तिसरा होता. एकून पाचच भाषनं होणार होती. पहिल्या दोघांनी बोलून घेतले. मास्तरांनी माझ्या नावाचा पुकारा केला. स्टेजवर जाण्याची ही माझी पहिली वेळ न्हवती. त्यामूळे स्टेज भिती वैगरे काही न्हवती पण त्या दिवशी काय झाले हे माहीत नाही. दोन-तिनदा केदार जोशी, केदार जोशी असे मास्तर ओरडत होते पण मी माझ्या बसल्या जागेवरून हाललो नाही. मी स्टेजपासून बराच लांब बसलो होतो त्यामूळे त्यांना दिसत न्हवतो. माझे पाय थरथर कापत होते, घाम फूटला होता आणी निघून जावे असे वाटत होते. अचानक काय झाले माहीत नाही, मी उठलो, त्या दिवशी मी काळी चड्डी घातलेली होती हे आठवते. हाताची पालथी मूठ कपाळावर व नाकावर फिरवली आणि स्टेजच्या दिशेने चालायला लागलो. तिथे जाऊन, "मी आपल्या इतिहासातिल दोन उदाहरणे तूमच्यासमोर ठेवत आहे असे सांगून नेताजी व सावरकर ह्या दोघांबद्दल बोललो बहूतेक." तयारी फक्त ६ मिनीटांची केली होती पण भाषन करताना कागद फेकून दिला आणी तसेच बोलायला लागलो. ते असंबध्द होते का न्हवते ते आठवत नाही. काय बोललो ते तर आठवतच नाही.पण कानडखेड गुरुजी नंतर जवळ आले आणी म्हणाले, "तूला भाषन निट करता येत पोरा. बापाचे नाव काढशिल."बापाचे नाव काढले की नाही हे माहीत नाही पण त्यांनी 'देता' च्या ऐवजी 'करता' म्हणलेले आजही लक्षात आहे. ती माझ्यासाठी शाळेतली अत्यूच्च आनंदाची घटना. त्यादिवशी ती थरथर झाली ती मला नक्कीच वक्ता करुन केली असे वाटते. पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर गेट मिटींग्स घेने, परिषदेत भाषन ठोकने, अन त्याही पुढे परिषदेचा एक बर्यापैकी मोठा पदाधिकारी होणे, ह्याचा पाया शाळेच्या ह्या घटनेत होता हे नक्की.
अश्यातच कधीतरी तिने मला पेन दिला होता. ती राहायची गणेश नगरला. म्हणून मी आणी अन्या तिकडे चक्कर मारायचो. तिच्या घरासमोर जायचे कधीच धजले नाही. पण गल्लीत व आ़जूबाजूच्या परिसरातील लोक बहुदा आम्हाला ओळखायला लागले होते. रोज एक चक्कर होतीच. तसेही आम्ही अन्याकडे अभ्यासाला जायचो. अन्या देखील गणेश नगरलाच राहायचा. मी तिथून काही फार लांब राहयचो नाही. मग अन्याकडून तिकडे.एके दिवशी आमच्या वर्गातली दुसरी मुलगी मला तिथे भेटली. ती ही त्याच गल्लीत राहायची हे मला माहीत न्हवते. ती घरीच चल म्हणून पाठीमागे लागली, मग तिच्यासोबत घरी जाणे भाग पडले. तिच्या आईने चिवडा व चकल्या दिल्याचे लक्षात आहे पण दिवाळी होती का हे आठवत नाही. त्या चकल्या फारस चविष्ट होत्या. तिने मला खोदुन खोदून विचारले की इकड का आलात? पण मी ताकास सुर लागू दिला नाही. दुसर्या दिवशी ती मैत्रीन आणी ती एकत्र बसले होते. तिच्या नजरेतून मला कळले की तिच्याघरी जायची काय गरज होती?नेमके त्याच दिवशी वर्गात सेनापती बापटांवरचा धडा चालू होता. माझ्या आणि तिच्या पुस्तकात सेनापतीचे सेपानती असे प्रिंट झाले होते कारण आम्ही पुस्तके नविन घेतली होती. दुसर्यांचा पुस्तकात तो घोळ न्हवता. बाईंनी सविताला धडा वाचायला सांगीतला आणि तिने सेपानती असा उच्चार केला. बाई म्हणाले, अग चिमने निट वाच. मग ती म्हणाली की सेपानतीच तर आहे. मला काय झाले काय माहीत मी देखील उठून सेपानती आहे सेनापती नाही असा वाद घातला व जरी चूकले असले तरी वाचनात काहीच चूक नाही हे पटवून दिले. त्या दिवशी एक बोरकूटाची पुडी मला सुट्टीत मिळाली. खरी कमाई. हे बोरकुट मी कधीच खायचो नाही. पोरींना जाम आवडायचे. त्या मग वर्गात आणून शाळा संपे पर्यंत खात बसत.
"विद्या विनयेन शोभते"
९ वीत असताना एके दिवशी आम्ही मुलं इटरंव्हल मध्ये एका वर्गाचा बाजूने जात होतो। तिथे कसलासा आवाज आला। जे वर्ग बांधलेले होते त्यांना मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या वर वर्गातले काय चालू आहे हे दिसत होते. तर तिथे दोन मास्तर एकमेकांना मारत होते. एका मास्तराने दुसर्यांचे डोके बेंच मध्ये घातले होते. आमच्या शाळेतील बेंच के लोखंडी होते. वर डेस्क, त्याखाली थोडी जागा, आणी परत एक लोखंडी फळी, त्यावर पुस्तकं ठेवता येईल अशी रचना होती. तर त्या मधल्या जागेत एका मास्तराचे डोके दुसरा मास्तर घालू पाहत होता. आणि ज्याचे डोके मध्ये जात होते तो. ' ओ ये ओ मेलो, मेलो" असे ओरडत होते आणि बाकीच चार पाच शिक्षक हा तमाशा पाहत होते. तो मारनार मास्तर शाळेत दारू पिऊन येतो अशीही वंदता होती. ह्या व अश्या दोन मास्तरांनी शाळेचा तमाशा केला होता व त्यांना विरोध करनारा मास्तर मार खात होता. अन त्या शाळेच्या बोर्डावर सुविचार लिहीला होता, "विद्या विनयेन शोभते". ते दृष्य अन हा विरोधाभास माझ्या डोळ्यासमोरुन कधीही जात नाही.
आमच्या बॅच पासून शाळेला गळती लागली. ती लागनारच होती हे वरिल देखाव्यातच अधोरेखीत होते. पण आमच्या बॅच मधले माझे सर्व मित्र नंतरच्या जिवनात बरेच हूशार निघाले. काही अपवाद वगळता सर्वच जन 'सेटल्ड' आहेत. पैसे हे मोजमाप जर आपण यशस्वीपणाला लावले तर त्या मोजमापाने सर्वच यशस्वी आहेत.
कानडखेडकर मास्तर आम्हाला मराठी शिकवायचे कुठल्यातरी वर्गात। बहूदा दहावी किंवा नववी. त्यांची एक वेगळीच स्टाईल होती. इतर मास्तरांचे म्हणने होते की त्यांचा शाळेत शिकवने हा मूळी मूळ धंदा नाही तर जोड धंदा आहे. त्यात तथ्य असावं कारण शाळेत येन्यासाठी कधी ते बजाज स्कूटर वापरत तर कधी चक्क ऑटो रिक्शा चालवत येत. ते नेहमी शाळा सुरु व्ह्यायच्या आधी व नंतर रिक्षा चालवीत का? असे आम्हाला वाटत असे. तसेच तेव्हां काही रिक्षावाले पोरांना आणून सोडत, तसे मास्तर ही "घरापासून ते घरापर्यंत" पोरांची जबाबदारी घेत असतील काय? असाही जोडप्रश्न मनात येत असे. पण ते शिकवत मात्र चांगल. पोरांनाच सांगत, "गधडहो आज काय करायचे" मग पोर कल्ला करत आणी ते धडा शिकवायला घेत. शिकवताना इतर गोष्टींच जास्त सांगत त्यामूळे त्यांचा तास आम्हाला आवडायचा. दुसर्या आवडनार्या बाई म्हणजे कुळकर्णी बाई. ह्या दिसायला खूपच सुंदर होत्या तसेच त्यांचा आवाजही चांगला होता. त्या आम्हाला हिंदी शिकवत. त्यांनी नेहमी कविता शिकवायला घ्यावी यासाठी आम्ही गोंधळ करत असू. मग त्या निट चालीवर कविता म्हणून दाखवत व त्याचा अर्थ सांगत. त्यांनी शिकवीलेले कायम लक्षात राहायचे कारण शिकवीताना त्या उदाहरणे सांगून शिकवत. सांस्कृतीक कार्यक्रम पण त्याच घडवून आणायच्या.
क्रमशः
![](http://www.blogger.com/img/icon18_edit_allbkg.gif)
wah kay mast lihtoys kedar..
malahi shaletlya athvani alya !!
ani tumche master danger distayt!! :O