रॅन्डम मेमरिज -३

0

Written on 4:09 PM by केदार जोशी

त्या काळी अस वाटायंच की क्रिकेट असताना शाळा का? (अजूनही अस वाटतंच फक्त आता ऑफीस का? हा प्रश्न पडतो).
रव्या, मी आणि मिल्याने धडपड करुन आमची एक टिम तयार केली. मिल्याकडे त्याच्या पूण्याचा मामाने दिलेली एक जड बॅट होती. ती खरीतर पुर्णाकृती माणसासाठी होती पण आम्ही अर्धवट तयार झालेली माणसं ( पक्षी, लहान मूल) ती बॅट वापरू लागलो. तिला स्ट्रोक भरपूर आहे, आणी त्या स्टोक मूळे माझे फोर जास्त जातात, त्यात माझी अक्कल काही नाही असे मिल्याचे नेहमी म्हणने होते. कारण मिल्याच्या बॉलींग वर सर्वात जास्त फोर्स मी मारल्या आहेत. टिम काही आमच्या ३ नी तयार होणारी न्हवती. म्हणून मग सदस्य संख्या वाढवावी लागनार होती. अश्यातच सहावी चालू असतानाच मध्येच 'क' मध्ये एक मूलगा भरती झाला. राधवेंद्र व्हाय व्ही अर्थात रघ्या किंवा वायव्ह्या. हा देखील होता दक्षिनेतला, पण पक्का मराठी. यवतमाळ की अकोल्याहून आमच्या शहरात त्याचा वडिलांची बदली झाली. रघ्यालाही आमच्या सारखाच क्रिकेटचा नाद असल्यामूळे व शाळा बूडविली म्हणजे आपण काही घोर पाप केले असे वाटत नसल्यामूळे तो आमच्यात सहज मिसळून गेला. तो देखील चांगली बॉलींग करायचा. मग हळूहळू इतर लोक सामिल झाले, ज्यात दुसरा एक रव्या, रव्या वाघमारे, जो चांगली बँटीग करायचा, आनंद, अभय वैगरे वैगरे. अन्या आणि शिन्या जरा क्रिकेट पासून लांबच राहीले. म बघता बघता आमची टिम मस्त तयार झाली. व शाळा बूडवून क्रिकेट खेळू लागली.

आम्ही सर्व सिझन बॉलने म्हणजे लेदर बॉलने क्रिकेट खेळायचो, इतर मुलांसारखे रबरी बॉलने क्रिकेट मी कधी खेळले नाही. प्रश्न होता निट बॅट, स्टम्प व इतर साहीत्याचा. वर्गनी गोळा करायचे ठरल्यावरही सर्वांचेच पालक काही पैसे देनारे न्हवते. मग अस्मादिकांनी एक शक्कल लढवली.
झाल काय की माझ्या आईचा पगार झाल्यावर एक दोन दिवसांनी आमच्या कपाटात भरपुर पैसे ठेवलेले दिसत। कपाटाला कूलूप कधी धातले जात न्हवते मग, म्या पामराने ते पैसे आई वडिलांना न सांगता क्रिकेट साठी एक दोनदा उचलले तर त्यात माझा काय दोष? अश्या एक दोन चोर्‍या मी पचवल्या व क्रिकेट किट आणले. तेव्हां १५० रु ला डि ऐस सीची चांगली बॅट मिळाली व एक दुसरी बॅट २६० च्या आसपास मिळाली. साल होते १९८५. आईच्या पगारात क्रिकेटचे साहीत्य तर दोनच दिवसात आणले, पण असे साहीत्य आणले तर घरी ठेवनार कसे हा प्रश्न आम्ही सर्वांमध्ये साहीत्याची वाटनी करुन सोडविला. साहित्य माझे पण माझ्याच घरी आणायला चोरी.

आई वडिलांना ते पैसे मी चोरले असतील असा संशय आला नाही. चोरी पचली. पण त्यांनी घराला कुलूप लावून किल्ली न्यायला सुरुवात केली. आमच्या शेजारचे दोन्ही घर माझ्या काकांचेच असल्यामूळे आम्ही मूल कूठे राहनार ह्याचा प्रश्न न्हवता. त्यांना असे वाटले की आम्ही घर उघडे ठेवल्यामूळे कोणी तरी येऊन चोरी करुन गेले. आता आली का पंचाईत? अजुनही पॅडस आणायचे होतेच. मग हळूच संधी साधून कधीतरी किल्ली काकांकडे असताना मी परत पैसे चोरले. पण ह्यावेळी अलगद पकडले जाऊ असे मनातंच आले नाही. मग काय आधी कांकानी, मग आई वडिलांनी आमच पार भजं करुन टाकलं. ओल्या फोकाने मार मिळाला. तेंव्हा ठरवल पैसे समोर दिसले तरी घ्यायचे नाही. अजुनही हजारो रु समोर ठेवले तरी आमच्या मनात वाईट विचार येत नाही, ह्याच पुण्य आमच्या वडिलांबरोबरच आमच्या काकांना आहे, ज्यांनी कन्हेरीचा फोक आणि पंख्याची वायर तोडून तयार केलेला फोक, आमच्यावर यथेच्छ चालवीला.
त्या तिन चोर्‍या सोडल्या तर आयूष्यात नंतर कधीही चोरी केली नाही।

ह्या घटनेवरून तूम्ही, आजचा मी कसा आहे हा अंदाज बांधू नका पस्तावाल। कारण लहानपनीच्या घटना वेगळ्याच असतात। ज्यातनं आपल जीवन घडत जात.

तर क्रिकेट मुळे अभ्यासात दुर्लक्ष व्हायला सुरु झाले होतेच. शिवाय आमच्या मास्तरांच आमच्या कडे फारस लक्ष नसावं असे आज वाटते. कारण आमच्या वर्गशिक्षीका एकताटे बाई, वर्गात यायच्या व दोन मिनीटांनंतर स्वेटर विनायला घ्यायच्या किंवा गवारीच्या शेंगा निवडत बसायचा. मला अजुनही आठवत नाही की त्या आम्हाला कोणत विषय शिकवायच्या. बर हे फक्त त्यांचाच बाबतीत नाही तर इतर अनेक सर नेमके 'क' आणि 'ड' ला कोणते विषय शिकवायचे, हे त्यांना तरी माहीती होते का हे माहीत नाही.
एक सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे। ते एकदा वर्गशिक्षक होते. त्यांनी अशी टूम काढली की मागील वर्षीचा पहिला जो कोणी आहे तो वर्गप्रमूख. मग रव्याशिवाय कोण असनार. म्हणून रव्या आमचा मॉनीटर झाला. ते सर धोतर घालायचे व बरेचदा त्यांना शिकवता शिकवता, खूर्चीत रेलून पाय टेबल वर ठेवायला आवडत असे. एकदा असे करताना काही तरी घोळ झाला वर सरांचे विश्वदर्शन समोरच्या काही मुला-मूलींना दिसले. त्यामूळे वर्गात जो घोळ झाला व जो हास्य्फोट झाला तो त्यांना स्वतला काही कळेना. मी पाठीमागे बसल्यामूळे मला नेमके काय झाले हे कळलेच नाही पण काही मुलांनी हे तास झाल्यानंतर सांगीतले त्यामूळे कळाले. पण सरांनी टेबलवरून जोरात पाय काढून घेतला व काही मूलांना वर्गाबाहेर जायला सांगीतले एवढ्यालाच मी साक्षीदार.ह्या रव्याला त्यांनी मॉनीटर केले होते. एकदा कोणाचा तरी तास ऑफ होता. मग रव्या फळ्यापाशी जाऊन आरडा ओरडा करनार्‍यांची नाव लिहून घेऊ लागला. एक सर्पे नावाचा प्राणि आमच्या वर्गात होता. तो फार आवकाळी होता, असे सर्वांचे म्हणने म्हणून कोणी त्याचा नादी लागत नसत. त्या सर्प्याचे नाव रव्याने फळयावर लिहीले. तो उठला व त्याने ते नाव पुसले. परत रव्याने लिहील, परत ह्याने पुसले असे दोन तिनदा झाल्यावर सर्प्याने भरवर्गात रव्याची गच्छी ( गच्छी म्हणजे कॉलर) पकडली व त्याला ढकलले. तो आणखी मार खाणार इतक्यात ते सर वर्गात प्रवेश करते झाले. त्यांनी हे सर्व बहुदा येताना पाहीले. 'मॉनीटर कोणे'? असा प्रश्न त्यांनी केल्यावर रव्या मी सर म्हणून त्याचा जवळ गेला. रव्या तिथे पोचताच सरांनी रव्याच्या श्रिमूखात लावून दिली, मूर्खा वर्ग सांभाळता येत नाही तर मॉनीटर कशाला झालास? असे जोरात विचारले. आधीच त्या सर्प्याने त्याला पिडले होते, त्यात जोरात कानशिलावर बसली, जे व्हायचे न्हवते तेच झाले आणि रव्याचा चड्डितून धार लागली. रव्या वर्गात मूतला. नंतर अनेक दिवस रव्याला लोक चिडवत होते पण आम्हाला त्यावर काहीही करता आले नाही. रव्या आमच्यावर खूप रागात आला व मी अन मिल्या बॅटींग करत असलो तर जोराने पायावरच बॉल टाकू लागला. एक दोन महिन्यांनंतर हे सर्व निवळले.

क्रमश:

If you enjoyed this post Subscribe to our feed

No Comment

Post a Comment