रॅन्डम मेमरीज -८

1

Written on 10:31 AM by केदार जोशी

माझ्या आई वडिलांना माझी चिंता होती का प्रश्न मला कधीच पडला नाही. पण आज हे सर्व आठवून लिहीताना ( आठवून लिहीताना म्हणने चूक होईल कारण मला हे सर्व लिहीताना आपोआप आठवत चाल्लयं, मी आठवून लिहीत नाहीये) हा प्रश्न पडलाय. घरी जाऊन विचारेन आज. की माझा तूम्हाला प्रश्न पडला होता का? लहानपणी माहीत नाही पण कॉलेज मध्ये नक्कीच पडला असनार कारण मी कॉलेज मध्ये भयंकर उचापत्या केल्या आहेत. पण त्या सर्व राजकिय. त्यात पानटपरीवर थांबून पिचकार्‍या मारत पोरींना छेडने, शिट्ट्या व टाँट मारणे हे कधी केले नाही. उलट ते करनार्‍यांना बदडले मात्र आहे. ते किस्से मोठेपणीचे. तूर्तास आम्ही लहान आहोत म्हणून लहानपणीचेच किस्से.


जिवशास्त्र, रसायनशास्त्र वैगरे माझे जानी दुश्मन होते (आणी आहेत). एकदा बाईंनी जिवशास्त्राचे प्रॅक्टीकल म्हणून एके दिवशी बेडूक आणला व तो सर्वांसमोर कापला. त्याला कापताना बघून मला चक्कर आली व मी डोळे मिटून घेऊन ते प्रॅक्टीकल पाहीले. नंतर बाईंनी प्रश्न विचारला, काय रे यकृत कूठेल अन प्लिहा कूठली? मी आपले अंदाजांनेच ठोकून दिले. बाईंनी, "काय दिवे लावनार हा पोरगा, चांगला ब्राम्हणाचा आहे, वाटत नाही ह्याचा कडे बघून" अश्या रितीने माझ्याकडे पाहीले. ती अक्षर मी ओळ्खली कारण त्याच नजरेने माझ्याकडे भौतीक व रसायनचे सर देखील पाहायचे. ह्या विषयांनी मला वेठीला धरले होते. इतिहास आणि भूगोल माझ्या आवडीचे विषय होते. गणितात गति होतीच. एकदंरीत कधीही मला, 'होपलेस' म्हणून कोणी पाहीले नाही. पण मी त्यांना मार्क कमी मिळवून चकित मात्र करीत असे. मला जो कोणी तेंव्हा भेटायचा, तर त्यांना असेच वाटायचे की हा हूशार आहे, पण मार्क बघीतल्यामात्र चकित होत असत.मूळात अभ्यास करने हा माझा प्रांत तेंव्हा न्हवता. उगीच खोटे का बोला? अभ्यास खर्‍या अर्थाने सुरु झाला तो ग्रॅजूऐशन नंतर. तो पर्यंत फक्त परिक्षा देने व न चूकता, डिस्टींग्शन मध्ये (स्वघोषीत, ६० पैकी ५२-५४) पास होणे व बाकीचा वेळ वाचन करने, क्रिकेट खेळने ह्यातच घातला. आणि तेंव्हा अभ्यास हा बाकी लोक करायला लावायचे. व आता मी स्वतः मला करावा वाटतो म्हणून करतो हा फरक आहेच. तर आम्ही दहावीचा अभ्यास नेटाने पुढे सरकवीत होतो. माझ्या बाबतीत एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे एकपाठीपणा. मला एकदा वाचलेले लक्षात राहते असे तेंव्हा मी छातीठोकपणे सांगत होतो, आताही सांगतोच पण छाती ठोकत नाही इतकेच. तर त्यामूळे बरेचदा अरे हे तर आपणं वाचलयं परत काय वाचायचे असे वाटत असे व मी परत ते वाचत नसे.


दहावीला गणिताला ट्यूशन होती. तो मास्तर गाजलेला होता पण हिरवट होता. त्याचा एक किस्सा लिहील्याशिवाय माझी दहावी होणार नाही म्हणून लिहीतो. वर्गात मुल मूली एकत्रच होत्या. एका मूलाचे नाव होते, 'लोंबते' तर ते मास्तर, त्याला काय लोंबते काही लोंबते की नाही हे विचारुन मूलींकडे पाहत असे. अश्या मास्तरांना फोडून काढायला हवे. मी ती ट्यूशन अर्धवट सोडली. म्हणजे पुढे गेलोच नाही.इंग्रंजीची देखील शिकवनी होतीच. त्या ट्यूशनला माझी एक अत्यंत जूनी मैत्रीन, जी माझ्यासोबत १ ली ते ४ थीत होती, ती यायची. ती दिसायला इतकी सुंदर आहे की ज्याच नाव ते. शिकवनारा मास्तर देखील तिच्याकडेच बघून शिकवायचा. ती आणि मी सोबत अभ्यास करायचो. तिच्यासोबत क्लासमध्ये फक्त अभ्यास करावा वाटत असे. तिची आणी माझी नाळ काही बाबतीत जूळली होती, जसे अवांतर वाचन, इतिहास, वक्तॄत्व वैगरे. ती माझ्या शाळेत न्हवती. नंतर तिची आणी माझी बॅन्च वेगळी ( मी कॉमर्स व ती हट्टाने आर्टस, नंतर इग्लींश एम ऐ झाली) होती त्यामूळे सहवास राहिला नाही पण मैत्री अजुनही आहेच. ते दिवस पटापट गेले. मी आणी ती मिळून वर्गात झालेल्या परिक्षांचे पेपरही तपासायचो.


खर्र खर्र सांगायचे तर मला हे न आणि ण चे घोळ अजूनही कळत नाहीत, ह्याचे कारण बहूदा मराठी व्याकरणाकडे कमी लक्ष देणे हे आहे. मला माहीतीय की ह्या लिखाणात अनेक चूका आहेत. पण तरीही, 'माझे जिवन गाणे' मी पूढे रेटतोय ते केवळ मला हे लिहून काढाव वाटतय म्हणून. ह्या लिखानातून मी माझे हरवलेले बालपण ( हा छोटा की मोठा न) शोधतोय आणी पून्हा जगतोय इतकेच.
मला वाचनाची सवय कधी लागली हे माहीत नाही. पण त्यात माझ्या आजोळी चालनार्‍या चर्चांचा प्रभाव होता हे नक्की. माझी एक मावशी, मामा हे मराठीचे प्राध्यापक तर, दुसर्‍या मावशीचे यजमान संस्कॄत पंडित व प्राध्यापक, उरलेल्या मावश्या पण शिक्षकच व सर्वच जण वाचक. दिवाळीच्या सुटीत त्या भावा-बहिनीच्यां पुस्तकावर चर्चा चालत, शिरवाडकर, मंगेशकर, पाटील, पुरंदरे, आरती प्रभू ही नाव घरच्यांचीच वाटत. आरती प्रभूंच्या कविता, नरहर कुरूंदकरांची पुस्तके ह्यावर रात्र रात्र चर्चा होत. मामाच्या घरी मोठमोठ्या साहितीकांचे येणेजाने असायचे, त्यामूळे नरकर कुरुंदकर, लक्ष्मीकांत तांबोळी वैगरेंची भेट झाली. अश्यातच कधीतरी मला वाचणाची सवय लागली असेल. ती हळू हळू वाढतच गेली. इतकी वाढली की जिवशास्त्राच्या बारिकश्या पुस्तकांत मी, 'पडघवली' टाकून वाचलेय. घरच्यांचा असा भ्रम की पोरगं अभ्यास करतंय, पण म्या म्हणजे. आपण लई हूश्शार. पण सांगायचे म्हणले तर आमची वाचनाची गाडी रुळावरुन ८० किलोमीटर प्रति तास धावू लागली होती. म्हणजे मी तासाला ८० पाने वैगरे वाचायचो. नशिबाने अजुनही वाचनाची सवय तूटली नाही.
अश्यातच आमची ट्रिप गेली। गोव्याला, त्यावर आता उद्या लिहीतो.


क्रमशः

If you enjoyed this post Subscribe to our feed

1 Comment

  1. Sonal |

    लिहा लिहा... जसं तासाला ८०च्या स्पिडने वाचन केलंत ना... तस आता दिवसाला किमान एक पोस्ट या स्पिडनं ब्लॉगिंग होऊ देत!! आम्ही वाचू आनंदे

     

Post a Comment